वॉटरग्रेसच्या कामाबद्दल काय म्हणताय जळगावचे लोकप्रतिनिधी?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात होत असलेलं साफसफाई, कचरा संकलनाचे काम हे असमाधानकारक असल्याची ग्वाही जळगाव शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’सोबत बोलताना दिली. याचबरोबर काही स्थानिक नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रभागामध्ये स्वच्छतेचे काम हे व्यवस्थित होत आहे. काहींनी मात्र ठीकठाक काम असल्याचे सांगितले.

जळगाव शहराचा विचार करता सध्या रस्ते आणि अस्वच्छता ही मोठा समस्या बनली आहे. वेळोवेळी घरी घंटागाड्या न येणे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसणे अशा समस्यांना जळगाव शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वॉटरग्रेस कंपनीला कचरा संकलनाचा मक्ता देण्यात आला असून यासाठी मनपा दरमहा दीड कोटी रक्कम अदा करीत आहे. सध्या सुरू असलेल्या कामाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे काय? हे जाणून घेण्यासाठी जळगाव लाईव्हने काही लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

आपण सर्व जण प्रशासनाला कर भरतो. यामुळे स्वच्छतेसाठी देण्यात येत असलेला निधी हा आपलाच पर्यायी जनतेचा पैसा आहे. मात्र वाईट बाब म्हणजे असे असूनही समाधानकारक काम संबंधीत ठेकेदाराकडून होत नाहीये. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव शहर

माझ्या प्रभागात होत असलेली साफसफाई समाधानकारक नाही. कित्येकदा यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे. मात्र प्रत्यक्षात काहीही होत नाही. मनपा प्रशासन कोणताही अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत आहे. – कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव मनपा

प्रभागातील स्वच्छता राहण्यासाठी रोज स्वतः फोन लावावे लागत आहेत, हि निंदनीय बाब आहे. जर संबंधीत ठेकेदाराला ठेका मिळाला आहे तर त्याचे काम आहे कि शहराची साफसफाई केली पाहिजे मात्र ती होत नाही. – विष्णू भंगाळे, नगरसेवक, जळगाव मनपा

माझ्या प्रभागाचा विचार करता काम ठीकठाक होत आहे, चांगलं किंवा वाईट अस म्हणता येणार नाही. – कैलास सोनवणे, नगरसेवक, जळगाव मनपा

माझ्या प्रभागाचा विचार केला तर हवं तसं चांगलं काम होत नाहीये. नागरिकांना साफसफाई करून मिळावी म्हणून आम्हाला रोज फोन लावून संबंधित ठेकेदाराकडून काम करून घ्यावा लागत आहे. काम नाही होत असेही म्हणता येणार नाही मात्र जसं काम होतं ते बरोबर नाही. समाधानकारक काम होत नाही – नितीन बरडे, नगरसेवक, जळगाव मनपा

माझ्या प्रभागात कायमस्वरूपी कर्मचारी असल्यामुळे समाधानकारक काम होत आहे. नागरिक कोणत्याही प्रकारची अस्वच्छतेची तक्रार घेऊन येत नाहीत.
धीरज सोनवणे, नगरसेवक, जळगाव मनपा

माझ्या प्रभागात सर्व कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी असल्यामुळे ते व्यवस्थित काम करत आहेत, मात्र समाधानकारक काम होत नाही.
अतुल हाडा,  भाजप

शहरामध्ये स्वच्छता व्हावी यासाठी केंद्र शासनाने मोठा निधी जळगाव मनपाला मंजूर करून दिला आहे. यातून घंटागाड्या देखील विकत घेऊन दिल्या आहेत. या निधीमधून कचरा वेचणे, तो जमा करणे आणि त्यावर प्रतिक्रिया करणे हे महानगरपालिकेचे काम आहे मात्र महानगरपालिका प्रशासन आणि जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी ज्यात मी सुद्धा आहे हे काम करण्यात असमर्थ ठरत आहेत. पर्ययी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
उन्मेष पाटील, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ.

आमच्या प्रभागामध्ये काम होत नाहीत. कचऱ्याची मोठी समस्या आम्हाला पाहायला मिळत आहे. कित्येकदा तक्रारी करूनही काम होत नाहीत.
रेश्मा काळे, नगरसेविका, जळगाव मनपा

कित्येकदा संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला की काम होतं. अन्यथा प्रभागात काम होत नाही. विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत ते उचलले जात नाहीत. हे ढीग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडूनच केल्या जातात. जे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही कित्येकदा तक्रार देखील केली आहे. मात्र अजूनही काही उपयोग झालेला नाही. – विश्वनाथ खडके, नगरसेवक, जळगाव मनपा