जळगाव : थाटामाटात लग्‍न पार पडल्यानंतर घरात घडला धक्‍कादायक प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । जळगावात आधीच चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. त्यात चोरटे आता लग्न सोहळ्यातही हात साफ करताना दिसून येतंय. अशातच थाटामाटात लग्‍न सोहळा आटोपल्‍यानंतर घरातून नवरदेवासह त्याची आई व बहिणीचे दागिणे लंपास केले आहे. एकूण ३ लाख ७ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला आहे. हा प्रकार जळगाव शहरातील आदर्शनगरात घडला असून याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

जळगाव शहरातील आदर्श नगरातील रहिवाशी पुनित वासुदेव मोतीरामाणी यांचे ७ फेब्रुवारीला लग्न होते. लग्‍न आटोपल्‍यानंतर ८ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी रिसॉर्ट येथील रुममध्ये त्यांची आई कविता मोतीरामाणी यांनी त्यांचा सामान एका बॅगमध्ये भरला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच नवरदेव आणि त्याची बहिणीजवळील सर्व दागिने त्यांनी एका प्लॅस्टीकचा लॉक असलेल्या कॅरीबॅगमध्ये ठेवले.

दागिने ठेवलेल कॅरीबॅग कविता मोतीरामाणी यांनी हॅण्डपर्समध्ये ठेवली. संपुर्ण सामान एका रुममध्ये ठेवून ते जेवणासाठी निघून गेले. पुनित मोतीरामाणी यांच्या पत्नीचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी आराम केला. सायंकाळी त्यांनी दागिने ठेवलेली पर्स उघडली असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेली प्लॅस्टिकचा लॉक असलेली कॅरीबॅग व दागिने दिसून आले नाही. त्यांनी लग्नाठिकाणाहून आणलेल्या संपुर्ण सामानात दागिन्यांचा शोध घेतला मात्र तरी देखील त्यांना मिळून आले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.

असा लांबविला ऐवज?

चोरट्यांनी १२ हजारांची ६ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, १८ हजारांची ९ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम वजनाची अंगठी ७० हजारांचा ३८ ग्रॅम वजनाचा आर्टिफिशिअल डायमंड असलेला नेकलेस, ९५ हजारांचा सोन्याचा ५२ ग्रॅमचा नेकलेस, ५२ हजारांचे सोन्याचे २६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १६ हजारांचे ८ ग्रॅम वजनाची चैन व २० हजारांचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ३ लाख ७ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला.