जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२६ । गेल्या दीड महिन्यांपासून तीव्र उन्हाच्या आणि उष्णतेच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जळगावकरांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने चाळीशी पार राहणारा जळगाव शहराचा पारा अखेर ४० अंशांच्या खाली घसरला आहे. काल ३१ मे रोजी शहर आणि परिसरात सुमारे २० ते २५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे वातावरणात गारवा वाढला असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

रविवार, ३१ मे रोजी जळगावमध्ये ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तब्बल ४९ दिवसांनंतर तापमान एवढ्या खाली आल्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून आणि तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी तापमान ३९ अंशांवर होते. त्यानंतर सतत पारा ४० अंशांच्या वरच राहिला होता.गेल्या दीड महिन्यापासून जळगावात सूर्य आग ओकत होता, ज्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते. मात्र, आता तापमानात झालेली ही घट जळगावकरांसाठी अतिशय दिलासादायक ठरली असून, आगामी काळात पावसाच्या आगमनाकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.

आगामी दोन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता असून १ आणि २ जून रोजी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे आगामी दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली
आगामी पाच दिवस वातावरण कसे राहणार….
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती…
१ जून : ३८ अंश, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट
२ जून : ३८ अंश, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट
३ जून : ३८ अंश, तुरळक पावसाची शक्यता
४ जून : ३९ अंश, सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस
५ जून : ३९ अंश, सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस







