गुरूवार, जून 8, 2023

राज्यातील ‘या’ भागाला पावसाचा इशारा; जळगावकरांना मिळणार का दिलासा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । सध्या राज्यातील बहुतेक भागांमध्ये उन्हाच्या तडाख्याने लोक होरपळू निघत आहे. उकाड्यापासून केव्हा दिलासा मिळेल याकडे नागरिकांचं लक्ष लागून असून अशात हवामान खात्याने काहीसा दिलासा देणारा अंदाज जारी केला आहे. आगामी दोन दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात वातावरण अंशत: ढगाळ राहणार आहे. तर पुढील 2-3 दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात ढगाळ आणि काही पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान, विदर्भात पावसाचा अंदाज आहे. तर इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील.

जळगाव जिल्ह्यातही पाऊस येणार नाही, मात्र ढगाळ ‎ ‎वातावरण होऊ शकतं. दरम्यान, ‎शनिवारी ज्येष्ठ महिना सुरु‎ झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, 26 तारखेला काही‎ ‎ प्रमाणात ढगाळ वातावरण होणार‎ आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात वेगळंच हवामान पाहायला मिळालं. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. तर, एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडला. यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला वातावरणात काहीसा गारवा होता. मात्र, काहीच दिवसात मे महिन्यात कडक उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या राज्यातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेनं नागरिकांना हैराण केलं आहे.

नागरिक आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. मात्र यंदा तीन दिवस लेट मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यांनतर तो महाराष्ट्रात 10 जून ते 15 जून दरम्यान, दाखल होण्याचा अंदाज आहे.