गोव्यातून दारू आणतायं, ही बातमी वाचा अन्यथा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । मद्यप्रेमींसाठी किंबहुना गोव्याहून महाराष्ट्र्रात मद्य आणणाऱ्या मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण आता गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लागणार आहे. असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
शंभूराज देसाई म्हणाले की, मी यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असंही देसाई यावेळी म्हणाले.