जळगाव जिल्ह्यातील विविध धरणांमधील जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली

सप्टेंबर 6, 2021 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली आहे. रविवारी (दि. ५) हा साठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून घट होत गेलेल्या वाघूर धरणसाठ्यातही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढ होऊन धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गिरणा धरणसाठाही ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

anjani dam

यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत गेला. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. तो ७ ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला. दोन महिन्यांत केवळ ३.३३ टक्के वाढ होऊ शकलेल्या जलसाठ्यात मात्र आता ७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान थेट १५.६९ टक्क्यांनी वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढ होण्याऐवजी उलट घट होत गेली होती. त्यामुळे ६५.०८ टक्क्यांवरून धरणसाठा ७ ऑगस्टपर्यंत ६२.१७ टक्क्यांवर आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांतच या धरणसाठ्यात ७.६६ टक्क्यांनी वाढ झाली व धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला व आता ७० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. यंदा ६९.९२ टक्क्यांपर्यंत वाघूर धरणाचा साठा पोहोचला असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळ्याचा शेवटचा महिना उजाडला तरी ते ३० टक्क्यांनी खालीच आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now