जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । भारतात मान्सून पावसाचा काळ हा साधारण जून ते सप्टेंबर असा असतो. त्यानुसार यंदा मान्सूनचा दाेन महिन्यांचा निम्मा हंगाम संपला. यंदा वेळेआधी दाखल झालेल्या मान्सून पावसाने राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या धरणसाठ्यात वाढ झाली. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात म्हणावी तशी हजेरी लावली नाही. मात्र गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील एकूण धरणात १५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

आजच्या (दि १ ऑगस्ट) तारखेपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून ४३.९७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्यावर्षीच्या याच दिवशी २८.५७ टक्के जलसाठा होता. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची मोठी चिंता तूर्तास दूर झाली आहे. मात्र आगामी दिवसात पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या निर्माण होऊ शकते.

सध्या जिल्ह्यातील सुकी या एकमेव धरणाने शंभरी गाठली आहे. तर तीन धरणांनी तळ गाठला आहे. अग्नवती, भोकरबारी आणि बोरी धरणातील जलसाठा शून्यावर आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प असलेल्या गिरणा आणि वाघूर धरणात पाणीसाठा मुबलक आहे.
खरंतर जळगाव जिल्ह्यात जूननंतर जुलै महिन्यातही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाहीय. जुलै महिन्यात सरासरी १८५ ते १९० मिमी पाऊस अपेक्षित असतो; पण यंदा तो १३० ते १३५ मिमीवरच थांबला आहे. गेल्या महिन्यात तर पावसाने तब्बल २० ते २२ दिवस ब्रेक घेतला होता. यामुळे खरिप पिके संकटात आल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने पुनरागमन केल्याने खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले. मागच्या चार पाच दिवसात पावसाने हजेरी लावली. पण हा पाऊस मध्यमच होता. आता जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने ब्रेक घेतला आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली. दुसरीकडे पावसाने ब्रेक घेतल्याने तापमानात वाढ झालीय. ५ ते ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सद्यस्थितीत (आज १ ऑगस्टपर्यंत ) उपलब्ध असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा :
हतनूर – २५.६५ टक्के
गिरणा – ६३.८३टक्के
वाघूर – ६५.३२ टक्के
अभोरा – ६९.६३ टक्के
मंगरूळ- ४६.५१ टक्के
हिवरा – ७.८८ टक्के
सुकी – १०० टक्के
मोर – ६५.९२ टक्के
बहुळा – २४. ८१ टक्के
अग्नावती – ०० टक्के
तोंडापूर – ९ टक्के
अंजनी – ४५.१७ टक्के
गूळ – ३७.१५ टक्के
बोरी – ०० टक्के
भोकरबाडी : ०० टक्के
मन्याड –१६.९६टक्के
शेळगाव बॅरेज – ८.०७टक्के








