जळगाव लाईव्ह न्यूज । गिरणा धरणातून सिंचनासाठी तिसरे व शेवटचे आवर्तन सोडण्यात आले असून यामुळे गिरणा नदी दुथळी वाहून निघत आहे. अनेकांनी गिरणा नदीतून पाण्याचा उपसा करायला सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीदेखिल तुडूंब भरल्या असून शेतशिवाराला ओलावा लाभला आहे. दरम्यान, गिरणानंतर मध्यम प्रकल्पांमधूनही आवर्तन सोडल्याने यंदा जिल्ह्याचा प्रवास ‘टैंकर ‘मुक्तीच्यादिशेने सुरु आहे.

२०२४ मध्ये ऑक्टोबर महिन्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. चाळीसगाव, जामनेर, भडगाव, अमळनेर या तालुक्यांना पाणीटंचाईच्या झळा बसायला लागल्याने शंभरावर टँकरची मदत घेण्यात आली होती. मात्र २०२५ मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंचनासाठी गिरणा धरणातून तीन तर बिगरसिंचनासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार तिसरे आवर्तन सुरु असताना आता मध्यम प्रकल्पातूनही आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील नदी-नाल्यांना फेब्रुवारी ‘जल’ श्रीमंती पावली आहे.

गिरणा धरण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव या शहरांसाठी व या भागाती शिवारासाठी महत्त्वाचे आहे. या धरणावर जळगाव जिल्ह्यातील सुमारे १२० गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या योजनांचे जलस्रोत बळकट व्हावेत यासाठी त्यातून नुकतेच आवर्तन सोडण्यात आले.
मध्यम कालव्यांमुळे दिलासा
जिल्ह्यातील गिरणा प्रकल्पातून ११०० क्यूसेक आवर्तन सुरू आहे. तर जामदा सांडव्यावरून १७७९, डावा कालव्यातून ४३४ तर उजव्या कालव्यातून ७० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच दहिगाव बंधाऱ्यातून ८६१ क्युसेक आवर्तन सुरू आहे. मन्याड उजव्या कालव्यातून ७०, बोरी डावा कालव्यातून ४२, भोकरबारी २५, सुकी उजवा २० आणि डावा ११, हिवरा डावा आणि उजवा कालवा प्रत्येकी २ आणि बहुळा उजवा कालव्यातून ७० क्यूसेक असे मध्यम प्रकल्पांमधून आवर्तन सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या ‘रब्बी’ हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पाणी वाया जाणार नाही, यादृष्टीने काळजी घ्यावी. शेतकरी तसेच सिंचन व पाणी वापर संस्था, नगरपरिषद प्रशासनाने आगामी उन्हाळयाचा कालावधी व उपलब्ध पाणीसाठा पहाता योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करीत अपव्यय टाळून, पाणीपट्टी देयकांची थकबाकी भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता यांनी केलं आहे.








