जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांनी शंभरी गाठली होती. यामुळे जळगावकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु यंदा तापमानाने कहर केला आहे. वाढत्या तापमान वाढीचा परिणाम धरणांमधील जलसाठ्यावर दिसून येतोय. उष्ण हवामानामुळे यंदा १५ एप्रिल रोजी हतनूर धरणातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 22 दलघमीने कमी झाला आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे वाढलेले बाष्पीभवन.

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलस्रोत असून यावर नगरपालिका, औष्णिक विद्युत केंद्र, अडनान्स फॅक्टरी, रेल्वे तसेच हजारो शेतकरी अवलंबून आहेत. मात्र, तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाष्परूपात हरवत आहे.
यंदा एप्रिल महिन्यातील बाष्पीभवन मागील वर्षाच्या तुलनेत काही दिवस जास्त नोंदले गेले आहे. 12 एप्रिल 2025 रोजी 0.45 मिमी बाष्पीभवन झाले, तर 2024 मध्ये हीच आकडेवारी केवळ 0.14 मिमी होती. गेल्या वर्षी हतनूरमधील जलसाठा 57.65 टक्के इतका होता. मात्र यंदा हतनूरमधील जलसाठा 49.02 टक्के इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात 8.63 साठा कमी झाला आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे वाढलेल्या बाष्पीभवनाचा हतनूर धरणाच्या जलसाठ्यावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
धरणातील सध्याची स्थिती (१५ एप्रिल २०२५ पर्यंतची)
जलपातळी: 211.520 मीटर
एकूण साठा: 258.0 दलघमी
जिवंत साठा: 125 दलघमी
टक्केवारी: 49.02 टक्के