जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२५ । नाशिक मधील जोरदार पावसाने अर्धा जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणातील जलपातळीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यात दमदार पाऊस नसताना जून महिन्यात गिरणा धरणातील जलसाठ्यात १२ टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. सध्या गिरणा धरणात ३२.२५ टक्के इतका जलसाठा आहे.

३१ मेपर्यंत गिरणा धरणातील जलसाठा २१ टक्क्यांवर आला होता. जूनच्या मध्यान्हानंतर नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गिरणातील साठा २८ टक्क्यांवर पोहोचला होता. पावसामुळे हा साठा ३२.२५ टक्क्यांवर आला. विशेष गेल्या वर्षी आजच्या दिवशी गिरणा धरणात केवळ १२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक होता.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास आहे. नाशिकमधील मालेगावला त्यातून पाणी मिळते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगावातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रास गिरणा धरणातून पाणी दिले जाते.तसेच पाचोरा, चाळीसगाव व भडगाव शहरासह अनेक गावांना पिण्यासाठीदेखील या धरणातून पाणी मिळते.
‘सुकी’त सर्वाधिक साठा
सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा सुकी प्रकल्पात आहे. या प्रकल्पात सध्या ८९.०१ टक्के इतका साठा आहे. त्यापाठोपाठ वाघूर धरणात (६५.२०), मोर मध्ये (६२.७१) जलसाठा उपलब्ध आहे.
‘हतनूर’चे १० दरवाजे उघडले
सद्यस्थितीत हतनूर धरणाचे १० दरवाजे एका मीटरने उघडे करण्यात आले आहेत. तर शेळगाव बॅरेजचे ७दरवाजे २ मीटरने उघडे करण्यात आले आहेत. त्यामुळे तापीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.
तीन धरणे शून्यावर
भोकरबारी, बोरीसह अग्नावती धरणातील जलसाठा सरत्या जूनमध्ये ही शून्यावर आहे. तर हिवरा (२.७६), तोंडापूर (६.९१) धरणातही जलसाठा अत्यल्प आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा २४.४२ इतका होता. यंदा मात्र हा जलसाठा ३५.७१ टक्क्यांवर आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे.







