⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

खडसेंनी केले भाजप आमदारांना फोन, म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्युज | १९ जून २०२२ | भारतीय जनता पक्षाने व राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय प्रतिष्ठेची करून ठेवलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. यातच महाराष्ट्रातले सर्वात मुत्सद्दी समजले जाणारे राजकारणी एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षातील काही आमदारांना मला मतदान करा असे फोन केले असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे आता उद्या च्या निवडणुकीमध्ये काय होणार ? हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

एकनाथराव खडसे आता जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी आपली संपूर्ण हयात ही भारतीय जनता पक्ष मोठा करण्यात घालवली. खडसे 2014 साली मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील होते. त्यावेळी कोणत्या आमदाराला भारतीय जनता पक्षाकडे तिकिट द्यायचं याचा अधिकार खुद्द खरचं कडे होता. त्यातलीच काही आमदार आता भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा निवडून आल्याने खडसे यांचे समर्थक हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत यात वाद नाही. एकनाथराव खडसे यांनी कित्येक कार्यकर्त्यांना आमदार केलं. तर आमदारांना मंत्री देखील केलं. असेच भाजपा मधले खडसे यांचे चाहते या होणार्‍या विधान परिषद निवडणुकीमध्ये खडसेंना मतदान करतील असा चर्चा राजकीय वर्तुळात असताना खडसे यांनी आमदारांना मला मतदान करा म्हणून फोन केला असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे आता उद्या होणारी विधानपरिषद निवडणूक चांगलीच गाजणार यात तीळमात्रही शंका उरलेली नाही.

आज सकाळपासूनच एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. सकाळी खडसे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याशी स्वतः जाऊन भेट घेतली व मतदान करण्याची विनंती केली. त्यानंतर एम.आय.एम.चे आमदार यांनी देखील मी नाथा भाऊंना मतदान करणार अशी घोषणा केली. यामुळे खडसे आता आमदारकीसाठी आपलं संपूर्ण राजकीय ज्ञान लावत असल्याचे दिसत आहे.

एकनाथराव खडसे आमदार झाल्याने संपूर्ण खानदेशात सह महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा वाढणार आहे. खडसे आमदार तर होणारच असे मेसेजेस गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. त्यांचे समर्थक नाथाभाऊ हे आमदार झालेच असे म्हणत आहेत. यामुळे आता खडसे आमदार होणार का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.