⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

ढोल ताशांच्या गजरात जळगावात विसर्जन मिरवणूकीला सुरुवात; रांगेत लागण्यावरुन हाणामारी

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ सप्टेंबर २०२३ | लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गुरुवारी सकाळी महापालिकेत मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर कोर्ट चौकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मेहरुण तलावावर गणेश घाट व सेंट तेरेसा शाळेकडील काठ अशा दोन ठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. यासाठी ९ तराफे, ४ क्रेन व ३ बोट सह पट्टीचे पोहणारे १५ तरुणही सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत ७० मंडळे सहभागी असतील.

महापालिकेचा मानाचा गणपतीपासून प्रारंभ होणार आहे. तर नवीपेठ गणेश मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हे मंडळ द्वितीयस्थानी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा विसर्जन मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होणार असून गणेश मंडळाना येथून मिरवणुकीच्या रांगेत लागावे लागणार आहे. मिरवणूक नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा चौक, दधिच चौक, रथ चौक, सुभाष चोक पांडे डेअरी चौक मार्गे जाऊन मेहरुण तलाव येथे बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

विविध भागांतून ढोल-ताशे, लेझीम तसेच विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे पथकांचा देखील विसर्जन मिरवणूकीत समावेश आहे. मिरवणुकीत विविध विषयांवर सामाजिक, धार्मिक संदेश देणारे देखावे मंडळातर्फे सादर केले जाणार आहेत. याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मिरवणुकीत महिला वर्गाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.

रांगेत लागण्यावरुन हाणामारी

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या रांगेवरुन कार्यकत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन कार्यकर्ते जखमी झाले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्या मुलाने व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली, असा आरोप नेहरु चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी केला आहे. तसा ऑडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास कोर्ट चौकात ही घटना घडली.

बुधवारी रात्रीपासूनच कोर्ट चौकात सार्वजनिक गणेश मंडळानी रांगा लावण्यासाठी सुरुवात केली होती. याच रांगेवरून नेहरु चौक मित्र मंडळ आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये वाद झाले. हे वाद विकोपाला जाऊन जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत आयुष गांधी हा गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अन्य एका कार्यकर्त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर फायटरने वार केल्याचे सांगण्यात आले.