तीन दिवसात चार्जशीट आणि तीन दिवसात निकाल, दुचाकी चोरट्याला तीन महिने कैदची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जामनेर पोलिसात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या मोटार सायकल चोरट्याविरुध्द गुन्हा शाबीत झाला असून त्याला जामनेर न्यायालयाने तीन महिने कैद व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिरालाल प्रकाश पाटील रा.लोणी-अडावद ता.चोपडा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अटकेनंतर अवघ्या तीन दिवसात त्याच्याविरुद्ध जामनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लागलीच न्यायालयाने निकाल दिला आहे.

जामनेर पोलीस ठाण्यात दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी हिरालाल प्रकाश पाटील रा.रा.लोणी-अडावद ता.चोपडा यास अटक करण्यात आली होती.

जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास हवालदार मुकुंद साहेबराव पाटील तसेच रमेश कुमावत, सुनिल राठोड, डोंगरसिंग पाटील, प्रविण देशमुख, सचिन पाटील, अतुल पवार यांनी पुर्ण केला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार चंद्रकांत बोदडे, निलेश सोनार यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

अवघ्या तीन दिवसात दोषारोपपत्र आणि तीन दिवसात शिक्षा सुनावली जाण्याचा हा बहुदा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असावा. दुचाकी चोरट्याला शिक्षा झाल्याने इतर चोरट्यांचे देखील धाबे दणानणार आहेत.