⁠ 
सोमवार, मे 6, 2024

पाचोऱ्यातील व्यावसायिकावर ओढावली गाडी जप्तीची नामुष्की

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२१ । पाचोरा तालुका तसा सर्वांना परिचित असून शहरातील काही मोजकेच चेहरे जनतेच्या लक्षात असतात. गेल्या काही वर्षात दोन-तीन नवीन चेहरे जास्त दमाने जनसंपर्कात आले आहेत. अशाच एका तरुण व्यावसायिकाने खरेदी केलेली चारचाकी पैसे न दिल्याने पुन्हा शोरूम चालकांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

पाचोरा शहरात गेल्या पंचवार्षिक कालखंडात अनेक राजकीय,  सामाजिक तसेच व्यावसायिक चेहरे जनतेच्या प्रकाशझोतात आले. एका व्यावसायिकाने गेल्या महिन्यात एक आलिशान चारचाकी मोठा गाजावाजा करत खरेदी केली. गाडीसोबत फोटो काढून जनमानसात पसरवले. वाहन खरेदीसाठी दोन दिवसात पैसे देण्याची मुदत न पाळल्याने शोरूम चालकांनी वाहन पुन्हा ताब्यात घेतले. जनमानसात आणि तालुक्यात असलेली आपली प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी व्यावसायिकाने शर्थीचे प्रयत्न केले.

दोन दिवसात अनेक बँकांशी संपर्क करून आपला सिबिल स्कोर सुधारण्याची धडपड करत काही अटी व शर्तींच्या अधीन राहून त्याने एका बँकेला लग्गा लावला. बँक चालकांनी आपली बाजू सुरक्षीत करीत चारचाकीसाठी कर्ज मंजूर करून दिले. शोरूमला गेलेली चारचाकी काही दिवसात पुन्हा दारी आली अन व्यावसायिकाची इभ्रत जाता जाता राहिली.

घरी आलेली चारचाकी पुन्हा दारी लागेपर्यंत व्यावसायिक मात्र अज्ञातवासात (हॉटेलला) होता. पाचोरा शहरात या प्रकरणाची चर्चा झाली असली तरी खेडोपाडी मात्र लोकांना मागोवा देखील नाही.