⁠ 
बुधवार, मे 1, 2024

आळंदीतील पोलिसांच्या लाठीमारात जळगाव जिल्ह्यातील वारकरी तरुण जखमी!

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ जुन २०२३ | आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकर्‍यांना लाठीमार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांकडून लाठीमार नाही तर झटापट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी चार वारकर्‍यांना एका घरात नेवून मारहाण केल्याचा आरोप एका वारकरी तरुणाने केला आहे. तो तरुण वारकरी जळगाव जिल्ह्यातील बोदर्डे (ता.भडगाव) येथील असून विशाल साहेबराव पाटील असे वारकरी शिक्षण घेणार्‍या तरुण कीर्तनकाराचे नवा आहे. या तरुण कीर्तनकारकाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत असून त्यात त्याच्या शर्टचा खिसा फाटलेला दिसत असून शर्टच्या डाव्या बाहीवर रक्ताचे डाग देखील दिसत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानवेळी आळंदी येथे पोलिस आणि काही जणांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा आरोप करण्यात येत होते. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारचा लाठीमार नाही तर ही केवळ झटापट होती, असं त्यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं की, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या.

त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत ३ वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवित होते. मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड्स तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

व्हिडीओमध्ये काय म्हटलेयं….
‘मी एक शिक्षण घेणारा वारकरी आहे. आम्हाला आत सोडा असे म्हणत होतो. आम्ही चार विद्यार्थी होतो व २० पोलीस होते. त्यांनी आम्हाला मारले लोकांमध्ये न मारता ते आम्हाला एका घरात घेवून गेले तेथे आम्हाला मारहाण केली. पोलिसांनी आमच्यावर हात का उचलला व आम्हाला का मारले? हेच आम्हाला जाणून घ्यायचे आहे.’

फडणवीसांकडून स्पष्टीकरण अन् अजित पवार आणि नाना पटोलेंकडून टीका

आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीमार झालेला नाही. आळंदीत झटापट आणि बाचाबाची झाली. त्यामुळे या संदर्भात कोणीही राजकारण करु नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले की, आळंदीत घडलेली घटना क्लेशदायक आहे. लाठीमार करणार्‍या पोलिसांचा आणि सरकारचा तीव्र निषेध करतो. ही घटना चीड आणणारी आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, वारकरी आणि पालखी परंपरेला संपवण्याचं जाती वादी सरकारने गालबोट लावण्याचं पाप केलं आहे. या सरकारचा धिक्कार करतो आणि सरकारमध्ये थोडी लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.