⁠ 
शनिवार, जून 22, 2024

बोदवडमध्ये धाडसी घरफोडी ! लाखोंची रोकडसह सोने-चांदीचे दागिने लांबवीले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं दिसून येतेय. अशातच बोदवड शहरातील खाटीक वाड्यातील एका घरातून रविवारी रात्री तब्बल ११ लाखांचा ऐवज चोरीस गेला. त्यात कपाशी विकून आलेली पाच लाखांची रोकडही चोरट्यांच्या हाती लागली. देव्हाऱ्यातील देवही चोरट्यांनी चोरून नेले.

शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग क्र. पाचमधील खाटीक वाड्यात विलास सीताराम फाटे यांच्या घरी ही धाडसी घरफोडी झाली. उकाडा होत असल्याने परिवारातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपले होते. चोरांनी त्याचा फायदा उचलला. कुटुंबीय झोपलेल्या वरच्या मजल्याच्या दरवाजाला बाहेरून कडी लावत त्यांनी चोरी केली. फाटे यांनी काही दिवसांपूर्वीच ९० क्विंटल कापूस विकून आलेले पाच लाख वीस हजार रुपये आणि व्यवसायासाठी ८० हजाराची रोकड असे सहा लाख रुपये कपाटात ठेवले होते. कपाटातील सहा लाख रुपयांची रोकड, २५ ग्रॅम वजनाचा हार, ४० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच देवघरातील चांदीच्या मूर्ती असा एकूण अकरा लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

पहाटे चार वाजता फाटे यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावलेली होती. त्यांनी पुतण्याला फोन करून दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी खालच्या मजल्यावरील कपाटातील साहित्य फेकलेले व लॉकर तोडलेले दिसून आले, तर देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीही चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत बोदवड गुन्हा दाखल करण्यात आला आहे