शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! जळगावमध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज, वाचा हवामान अंदाज

जानेवारी 31, 2026 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतोय. कधी थंडी, ढगाळ वातावरणसह पाऊस तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. चार दिवसापूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले. असं असताना हवामान खात्यानं शेतकऱ्यांचं टेंशन वाढवणारा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

avakalipaus

राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण होत असून जळगावसह राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे तापमानातही चढ उतार सुरु आहे. गुरुवारी १५ अंशावर गेलेला किमान तापमानाचा पारा काल शुक्रवारी १३.५ अंशावर घसरला. यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेस थंडीचा काहीसा कडाका जाणवत आहे. दरम्यान २७ जानेवारी रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यातच जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने २ ते ५ फेब्रुवारी या काळात दुपारी ४ वाजेनंतर अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी हा पाऊस तुरळक असेल, तर काही ठिकाणी अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात वाऱ्याचा वेग ४० किमी प्रतितास इतका राहू शकतो, ज्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण झाले आहे. बाष्पाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात ढगांची दाटी होत आहे. यामुळे अवकाळीची स्थिती निर्माण होत आहे.

आगामी पाच दिवस वातावरण कसे असेल…
दिनांक.. रात्रीचे तापमान, वातावरणाची स्थिती
३१ जानेवारी : १८ अंश.. काही अंशी ढगाळ वातावरण
१ फेब्रुवारी : १७ अंश.. सकाळच्या वेळेस दाट धुकं, दुपारनंतर ढगाळ वातावरण
२ फेब्रुवारी : १६ अंश.. ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची शक्यता
३ फेब्रुवारी : १५ अंश.. ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची शक्यता
४ फेब्रुवारी : १४ अंश… ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची शक्यता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now