जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी अन् वादळी पावसाचे संकट? वाचा हवामान अंदाज

जानेवारी 30, 2026 9:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील वातावरणात चढ उतार पाहायला मिळत असून काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहे. जळगाव जिल्ह्यात तीन दिवसापूर्वी (२७ जानेवारी) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. दरम्यान आता फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील अवकाळीचे संकट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

rain

मागच्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे तापमानात चढ उतार होत असलयाने थंडीचा जोर ओसरला आहे. काल दिवसाच्या तापमानात ३ अंशापर्यंतची घसरण दिसून आली. बुधवारी ३१.५ अशांवर असलेले कमाल तापमान गुरुवारी घसरून २७.६ अंश इतके होते. तर रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली. गुरुवारी रात्रीचे किमान तापमान १५ अंशावर होते.

आज कसं राहणार हवामान?
दरम्यान, आज आकाश ढगाळ तर या कालावधीत किमान तापमान १४ ते १६ अंशांवर राहील. ज्यामुळे रात्री आणि पहाटे गारठा जाणवणार आहे. कमाल तापमान ३० ते ३३ अंशांवर राहण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी हवामान उबदार असेल. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळणार असल्याने दिवसभर हवेत एक प्रकारचा ओलावा आणि थंडावा टिकून राहील.

जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे सावट?
दरम्यान २७ जानेवारी रोजी जळगावमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे हजारो क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रब्बी पिकांची काढणी होते. मात्र, याच काळात राज्यातील काही जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका

जळगाव जिल्ह्यात २७ जानेवारीला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका बसला. चोपडा, रावेर, चाळीसगाव , मुक्ताईनगर ,एरंडोल, पारोळा , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात गारपिटीमुळे ५७ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगावच्या ९ गावांमधील पिकांची हानी झाली आहे. जळगावच्या १७, मुक्ताईनगरच्या ६५, एरंडोलच्या १६, पारोळ्यातील २५ व धरणगावच्या ५४ गावांमधील रब्बी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now