⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मी अधिक खोलात गेलो तर.. मंत्री महाजनांना उन्मेष पाटीलांचा थेट इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । भाजपला (BJP) सोडचिट्टी देऊन शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील (Unemsh patil) यांनी आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शेतकरी हितासाठी मोठ मोठी घोषणा करीत आहे परंतु त्यांचे दूत असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) मात्र त्यांच्या विरोधी निर्णय घेत आहेत.

गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही, पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, जिल्ह्यात गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत.

इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आपला जिल्हा चांगला केला आहे. हे मात्र कॅबीनेटमध्ये काय झोपा काढतात काय? असा सवालही त्यांनी केला आहे. महाजन हे केवळ भाषणे देऊन टीका करीत असतात. त्यांनी आता सांभाळून बोलावे आपण जर खोलात गेलो तर जामनेरमधून बाहेरही निघू देणार नाही, असा खणखणीत इशारा इशारा उन्मेश पाटील यांनी दिला आहे.भाजपातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते.

जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्यातर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आले आहे. त्यावर त्यांनी टीका केली. गटसचिवांना दोष देवून त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासाठी जिल्हा बँकेचे व्यवस्थापन जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री म्हणून याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. ते शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असतांना जिल्ह्यातील मंत्री मात्र त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहेत.

मंगेश चव्हाणांवरही टीका
दरम्यान, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ठेकेदारांना ब्लॅकमेलसह प्रवीण चव्हाण प्रकरणात उन्मेश पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षाने त्यांचं तिकीट कापलं, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. यावर बोलताना उन्मेष पाटील म्हणाले की, मंगेश चव्हाण हे राजकारणात साडेतीन वर्षाचे. त्यांना ऑक्टोबरमध्ये उत्तर देणार, असे उन्मेष पाटील म्हणाले