जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव रेल्वे स्थानकावर भाजपतर्फे २५ फेब्रुवारी २०१४ रोजी कामायनी आणि सचखंड एक्स्प्रेसला थांबा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल होता. तब्बल आठ वर्ष चाललेल्या खटल्यानंतर भुसावळ रेल्वे न्यायालयाने आंदोलकांसह खासदारांची शुक्रवारी निर्दोष सुटका केली.
चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर झालेल्या रेल्वे रोको आंदोलनात भाजपचे तत्कालीन पदाधिकारी उन्मेश पाटील, तत्कालीन तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, तत्कालीन शहराध्यक्ष नगरसेवक राजू चौधरी, उद्धवराव माळी, नगरसेवक संजय घोडेस्वार, माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, घृष्णेश्वर पाटील, शरद चौधरी, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शुक्रवारी खा.उन्मेश पाटील यांच्यासह सर्वांची भुसावळ रेल्वे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
खासदारांतर्फे अॅड.आर.एम.यादव (भुसावळ), अॅड.वैशाली साळवे (भुसावळ) यांनी कामकाज पाहिले. निकालप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे उपस्थित होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी केलेला लढा यशस्वी झाल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.