⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दातृत्व अन् कर्तृत्वाने वाहिली अनोखी श्रद्धांजली!, ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । काही लोक दाखविण्यासाठी दान करतात तर काही लोक सेवा आणि समाजाचं देणं म्हणून दान करतात. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या एस.डी. सीडसने आज व्यापक रूप घेतले असून अनेक दाते देखील योगदान देत असतात. जळगावातील ललवाणी परिवाराने वडील स्व.शांतिलालजी रूपचंदजी ललवाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच वडील बंधू स्व.मुकेशजी शांतिलालजी ललवाणी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कोणताही बडेजाव न करता उपक्रमासाठी आज ५ लाख, ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

२००८ साली एकीकडे आपल्या मुलाने स्वमालकीचे हेलिकॉप्टर घेतले, तर दुसरीकडे त्याच दिवशी शुभेच्छा देण्यासाठी डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी हे तत्कालीन आमदार श्री.सुरेशदादा जैन यांच्याकडे पोहोचले. प्रसंग होता एका गरजू विद्यार्थ्याला दिलेल्या आर्थिक मदतीचा!
शिक्षणासाठी पैसा नसल्याने आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्यासंदर्भातील घटना ऐकून दादा व्यथित होते. विशेष कोणतेही निकष न तपासता त्यावेळी सुरेशदादांकडून मदत दिली जात असे. रत्नाभाभी जैन, मीनाक्षी जैन, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, शिक्षणतज्ज्ञ नीलकंठराव गायकवाड, डॉ.एस.एस. राणे व इतर २४ जणांच्या समितीने जात-पात-धर्म-राजकारणविरहित आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या परंतु हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अराजकीय संस्था ‘एस.डी. सीडस्’ या नावाने २००८ साली स्थापन केली.

आजपर्यंत सुमारे १४ हजार ३०० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या संस्थेतर्फे अर्थसहाय्य करण्यात आले. उज्ज्वल भारताचे उत्तम नागरिक घडावेत, हा एकमेव त्यामागील हेतू. पहिल्या वर्षी सुरेशदादा जैन यांनी २५ लाख रुपये दिले आणि सन २००८ ते २०२१ या कालावधीत लाखो रुपये देत राहिले. ही रक्कम कोटींच्या घरात गेली. स्वतः अडचणीत असतानासुद्धा सर्व संचालक व तज्ज्ञांच्या आग्रहाखातर विद्यार्थी दत्तक योजना सुरू झाली. अगदी रुपये पाच हजारांपासून दाते यामध्ये योगदान देऊ लागले.

आपले वडील स्व.शांतिलालजी रूपचंदजी ललवाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच वडील बंधू स्व.मुकेशजी शांतिलालजी ललवाणी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कोणताही बडेजाव न करता ललवाणी कुटुंबीय म्हणजेच राजेश,अजय, नीलेश व परिमल ललवाणी यांनी आज सोमवार, दि.४ ऑक्टोबर रोजी ‘सुरेशदादा अ‍ॅऩ्ड रत्नादेवी चॅरिटेबल फाऊंडेशन’द्वारा संचलित ‘एस.डी. सीडस्’ या संस्थेस विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत ५ लाख ५५ हजार ५५ रुपयांचे चेक दिला, यामागे स्व.मुकेशजी ललवाणी यांचीच प्रेरणा.
त्यांना नेहमी वाटत असे, की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एस.डी. सीडस्’ हे उत्तम कार्य करीत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा आणि ती इच्छा आज ललवाणी कुटुंबीयांनी प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. हे कर्तृत्व आणि दातृत्वाचे अनोखे उदाहरणच त्यांनी समाजासमोर ठेवले. अगदी चांगल्या कार्यात खारीचा वाटा प्रत्येकाचा असावा, सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, ही भावना व्यक्त करीत त्यांनी हे भरीव योगदान दिले.
‘एस.डी. सीडस्’च्या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आजपर्यंत अनेक मान्यवर विशेषतः रघुनाथ माशेलकर, नरेंद्र जाधव, आनंद कर्वे, भवरलाल जैन, विजयबाबू दर्डा, हनुमंतराव गायकवाड यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे येऊन गेले, हे विशेष! ललवाणी कुटुंबीयांच्या या अनोख्या श्रद्धांजलीपर कार्याचे सर्व सर्व समाजातून कौतुक होत आहे. प्रत्येकाने www.sdseeds.com या वेबसाईटवर जाऊन ‘एस.डी. सीडस्’चे कार्य पाहायलाच हवे.