⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

धानोऱ्यातील पिता पुत्राची अनोखी देशभक्ती : १५ वर्षात ८०० वर राष्ट्रध्वजांची केली मोफत इस्त्री

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । आपल्याला देशसेवा करावयाची असेल तर ती कोणत्याही प्रकारे करता येऊ शकते; अगदी घरी बसून सुद्धा तुम्हाला विश्वास बसत नसेल तर चोपडा तालुक्यातील धानोरा येथील परीट (धोबी) समाजाचे पितापुत्रांनी गेल्या १५ वर्षापासून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनसाठी लागणाऱ्या राष्ट्रध्वजांची (तिरंगा झेंडा) मोफत इस्त्री करून देण्याचा एक अभिनव उपक्रम सुरु करून त्यामाध्यमातून भारत देशाबद्दल असलेली आपली देशभक्तीचे एक उत्तम उदाहरणच दिले आहे.

धानोऱ्यात आपला पारंपारिक लॉंन्ड्री व्यवसाय करणारे प्रकाश खैरे व मुलगा आकाश यांनी गेल्या १५ वर्षात गावातील ग्रामपंचायत, जि.प. मराठी शाळा, आश्रम शाळा, माध्यमिक विद्यालय, पिक संरक्षण सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी, दुध डेअरी आदी ठिकाणी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनसाठी लागणाऱ्या तिरंगा झेंड्याची मोफत इस्त्री करून देतात. त्यांनी आतापर्यंत जवळपास आठशे राष्ट्रध्वजांना इस्त्री करून दिली आहे.

घरीबसून देशभक्ती

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी गावातील व परिसरातील शाळा व सहकारी संस्थेतील कर्मचारी राष्ट्रध्वज इस्त्रीसाठी घेऊन येतात यासाठी काहीजण त्यांना पैसेही देऊ करतात परंतु मी या तिरंग्याची इस्त्री करीत असून इस्त्री करण्याचे भाग्य मला घरी बसून लाभत असल्याने माझ्या हातून एक प्रकारे देशभक्तीच केली जात असल्याची जाणीव होत असल्याचे खैरे सांगतात. मुलानेही स्वीकारला पारंपारिक व्यवसाय प्रकाश खैरे यांचा मुलगा आकाश हा पदवीधर असून नोकरी न मिळाल्याने त्याने आपल्या वडिलांच्या पारंपारिक लॉंन्ड्री वसायात मदत करीत आहे. व त्यानेही आजपावतो ४०० राष्ट्रध्वज इस्त्री केले आहेत.

राष्ट्रध्वज इस्त्रीसाठी आल्यावर इतर सर्व कामे बाजूला सारून तिरंगा झेंड्यांची इस्त्री करतो. यासाठी मजुरी म्हणून संबंधित व्यक्ती पैसे देऊ करतात परंतु मला आपल्या देशासोबत आपले राष्ट्रध्वजाचा अभिमान असल्याने माझ्या हातून देखील देशभक्ती व्हावी म्हणून मी १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजांची मोफत इस्त्री करीत आहे.

– प्रकाश खैरे, लॉंन्ड्री व्यावसायिक.