जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिलव २०२२ । केंद्राचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी २२ एप्रिल राेजी जळगाव जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणसह विविध मार्गांचे तसेच उड्डाणपुलांचे लोकार्पण व नविन कामांच्या भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भाेळे व खासदार उन्मेष पाटील यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.

२०१५ मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जळगावात सुमारे १७०० काेटी रूपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन केले हाेते. त्यापैकी सुमारे ४ हजार काेटी रूपयांच्या कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यात जिल्ह्यातून जाणारे चिखली ते तरसाेद फाटा महामार्ग, जळगाव शहरातून जाणारा महामार्ग, जळगाव ते भडगाव, जळगाव ते औरंगाबाद महामार्ग यासह उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश असल्याचे सांगितले. रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. या कामांचे लाेकार्पण व सीआरएफच्या १०० कोटींच्या नवीन कामांचे भूमीपूजन २२ राेजी शिवतीर्थ मैदानावर होईल. या वेळी राज्याचे मंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदारांना आमंत्रित केले जाणार आहे. कार्यक्रम नियाेजनासाठी साेमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपाचे सरचिटणीस मधुकर काटे, अरविंद देशमुख उपस्थित हाेते.









