दुर्दैवी : कबुतर पकडण्यासाठी तरुण विहिरीत उतरला अन् बुडाला
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने विहिरीत पडून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेळगाव शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करण उर्फ कालू चुडामण भिल (पवार) वय-२४ रा. शेळगाव ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार ९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भील आणि पुतण्या सम्राट गोरख भिल हे देखील होते. दरम्यान, विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. दरम्यान त्याचा पाय निसटल्याने २०० फुट खोल विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. काका विहिरीत पडल्याचे पाहून पुतण्या सम्राट हा धाव गावात येवून माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विलास पाटील आणि नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत प्रचंड गाळ असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. रविवारी १० एप्रिल रोजी नागरीकांच्या मदतीने विहिरीतून दुपारी १२ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आाली आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे आणि पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.