⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल उपसा सिंचनच्या 502 कोटीच्या योजनेस तत्वतः मान्यता; या गावांतील कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार

यावल उपसा सिंचनच्या 502 कोटीच्या योजनेस तत्वतः मान्यता; या गावांतील कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या ५९२ कोटींच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. २७ जून २०२३ ला ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

पालकमंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. मंत्री पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला असून, वचनपूर्ती केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

यावल तालुक्यातील बहुतांश क्षेत्र सीजीडब्लयू अहवालानुसार भूजल वापरदृष्ट्या डार्क झोनमध्ये येते, तसेच शेळगाव बॅरेजच्या जलाशयापासून १६ किलोमीटर दूर व १०० मीटर उंचीवरील यावल तालुक्यातील अधिसूचित क्षेत्राला शेतकरी वैयक्तिकरित्या पाणी उपसा करू शकत नव्हते. शेळगाव बॅरेजवर आतापर्यंत ९०० कोटींचा खर्च झाला असला, तरी हजारो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असूनही केवळ यावल उपसा सिंचन योजनेस मंजुरी नसल्यामुळे आपले क्षेत्र ओलिताखाली आणता येत नव्हते. मात्र, या उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने शेळगाव बॅरेजमधील विनावापर असलेले पाण्याचा वापर होऊन शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे.

यावल तालुक्यातील या गावातील कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार
जळगाव ग्रामीण मतदारमतदारसंघातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट आहे. शेळगाव बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले. आतापर्यंत त्यात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यंदा १०० टक्के साठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा १६६.३६६ दशलण घनमीटर आहे. यावल तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, महेलखेडी, कोरपावली, दहिगाव, वाघोदे, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराळे, शिरसाट, यावल शहर, सांगवी बुद्रुक, चितोडे, अट्रावल, सातोद, कोळवद या १९ गावांतील ९१२८ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.