⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

दुधात भेसळ करणाऱ्या मुख्य संशयिताला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । चोपडा तालुक्यातील बिडगाव गावा पुढील कुंड्यापाणी रस्त्यावर दुधात भेसळ करणाऱ्यांवर २३ मार्चला तीन वेगवेगळ्या विभागाच्या पथकाने कारवाई करून अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेसह अडावद पोलिसांना महिनाभरापासून गुंगारा देत होता. शनिवारी अडावद पोलिसांच्या पथकाने गुजरात हद्दीजवळ पळासनेर चेक पोष्टजवळ त्याला शिताफीने अटक केली.

अधिक माहिती अशी की, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बिडगाव-कुंडयापाणी रस्त्यावर काही जण दुधात भेसळ करायचे. परिसरातील गावांमधून म्हशीचे दुध एकत्र केल्यानंतर त्यात ही भेसळ केली जायची. यात पामतेल आणि वे-पावडर टाकून म्हशीच्या दुधाचे फॅटचे प्रमाण सहा से आठने वाढवून १० ते १९ केले जात होते. कमाई करण्याचा गोरख धंदा २३ मार्च रोजी रात्री झालेल्या कारवाईतून उघड झाला होता. अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस महा निरीक्षकांचे पथक अशा तिघांच्या कारवाईत या अवैध व्यवसायाचा भंडाफोड झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित लक्ष्मण बुटा भरवाड हा महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. लक्ष्मण भरवाड यास अडावद पाेलिसांच्या पथकाने पळासनेर चेक पाेस्टजवळ ताब्यात घेतले. चोपडा न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.