⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

दिव्याखाली अंधार : महापौरांच्या मेहरूण परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा

जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारा पाणीपुरवठा संदर्भात दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. यातच धक्कादायक बाब म्हणजे महापौरांच्या मेहरूण परिसरात सोमवारी झालेल्या पाणीपुरवठा दरम्यान नागरिकांच्या घरात अशुद्ध व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागरिकांच्या भांड्यांच्या तळाशी गाळ साचला होता.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये मेहरूणमधील मराठी शाळा परिसरात सोमवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला होता. आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याची तयारी केली; परंतु सुरुवातीला बराच वेळ पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने भरण्यात आले नव्हते. त्यानंतर नागरिकांनी पाण्याचा साठा केला. पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्यांची पाहणी केली असता बऱ्याच घरांमध्ये भांड्याच्या तळाशी गाळ व हिरव्या रंगाचे शेवाळ जमा झाल्याचे राष्ट्रवादीचे साजिद पटेल यांनी सांगितले. यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने किमान शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा तसेच परिसरातील गळती दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

महापौर जयश्री महाजन , विरोधी पक्षनेते सुनील महाजन , नगरसेवक प्रशांत नाईक यांसारख्या मातब्बर नेत्यांच्या वार्डात जर असा प्रकार घडत असेल तर इतर भागातील नागरिकांचा वाली कोण ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.