Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील ९० टक्के भागात प्रमुख रस्त्यांवर आणि प्रभागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर नगरपरिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे अनधिकृत गतिरोधक व खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय शहारत अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असून याकडे नगरपरिषद विभाग, जळगाव व नगरपरिषद यावल यांनी तात्काळ याकडे लक्ष घ्यावे अशी मागणी यावल शवासियांकडून होत आहे. तसेच काही संघटनांचे लोकप्रतिनिधींशी असलेले हितसंबंध लक्षात घेता विरोधक आणि सत्ताधारी गटातील काही लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवायला तयार नाही हे यावलकरांचे दुर्भाग्य असल्याची चर्चा शहारत होत आहे.

यावल शहरात विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्चून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, ही पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने संबंधित यंत्रणेला टक्केवारी वाटप करून त्याच्या सोयीनुसार पाईपलाईनचे काम केल्याने संपूर्ण रस्त्यांचे गाड रस्त्यामध्ये रूपांतर झाले. परिणामी जागोजागी खड्डे निर्माण झाले, लोकांना वाहने चालवणे आणि पायदळ चालणे मुश्किल झाले आहे. त्यात पुन्हा नवीन पाईपलाईन मधुन पाणीपुरवठा होत नसल्याने पाईपलाईन दुरुस्तीसाठी पुन्हा जागोजागी खड्डे खोदण्यात आले. दुरुस्ती केल्यानंतर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने नागरिकांना आपली वाहने चालविताना आणि पायदळ चालताना मोठे अडथळे निर्माण होत आहे.

तसेच शहरात प्रमुख रस्त्यावर आणि विकसित भागातील संपूर्ण रस्त्यांवर अनधिकृतपणे ठिकठिकाणी मोठमोठे गतिरोधक टाकण्यात आले. अपघात होऊ नये, म्हणून गतिरोधक ही आवश्यक बाब असली तरी गतिरोधक साठी परवानगी आवश्यक असून नियमानुसार गतिरोधक झालेले नाहीत. तर काही ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून याकडे यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता व पाणीपुरवठा विभाग प्रमुख तसेच मुख्याधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सदर कामाची टक्केवारी ठरलेली असल्याने बिल तात्काळ ठेकेदाराला अदा केला जातो. परंतु, काम कसे केले? काय केले? याची प्रत्यक्ष पाहणी बांधकाम विभाग का करत नाही? असे प्रश्न शरवासियांकडून होत आहे.
शिवाय आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे संपूर्ण शहरात साथीच्या आजार फटका बसू शकतो. तसेच शहारत अनेकांची नवीन इमारती व घरांची बांधकामे दुरुस्ती सुरू असल्याने भर रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून असल्याने मोठे अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद विभाग, जळगाव यांनी यावल नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन यावल शहरातील विविध भागाची पाहणी करून यावल नगरपालिकेची चुकीची व बोगस झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.












