⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

धनुष्य बाण शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देखील शिवसेनेतील गळती अद्याप थांबत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहे. दरम्यान, आज फेसबुकद्वारे त्यांनी पुन्हा संवाद साधत शिवसेनेच्या घटनेप्रमाणे धनुष्य बाण हे चिन्ह कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. तसेच अडीच वर्ष माझ्यावरील प्रेम कुठं गेलं होते? असाही सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला आहे.

कधीकाळी आमचा एकच आमदार होता. एक असो, ५० असो वा १०० असो कितीही आमदार सोडून गेले तरी पक्ष संपत नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. पैशांचे आमीष दाखवून आणि दमदाटी करून पक्ष घेऊन जाता येत नाही. माझ्यासोबत राहिलेल्या आमदारांना देखील आमीष, धमक्या देण्यात आल्या पण ते गेले नाही. माझा न्यायदेवतेवर, न्याय मंदिरावर विश्वास आहे. शिवसेनेचे काय होईल ते पाहायला शिवसैनिक सक्षम आहे. उद्याचे काय भवितव्य काय असेल आणि देशाच्या पुढील वाटचालीला दिशा देणारा हा निकाल असेल. देशाचे आणि जगाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

मातोश्रीने आम्हाला सन्मानाने बोलाविले तर आम्ही चर्चेला तयार आहोत असे ते लोक म्हणतात. आज देखील तिकडे गेल्यावर त्यांचे मातोश्रीवर प्रेम आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आज जे प्रेम दाखवता आहेत ते गेल्या अडीच वर्षात माझ्यावर टीका करणाऱ्यांबद्दल कधीही बोलले नव्हते. तेव्हा यांची दातखीळ बसली होती. टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आज हे बसता आहेत. त्यामुळे त्यांचे हे प्रेम खरे की खोटे हे सांगता येत नाही.

साध्या साध्या लोकांना इतकी पदे देऊन देखील ते असे वागले त्यामुळे पक्षाचे काय चुकले याचे उत्तर त्यांनी द्यावे. मला माझ्याकडून वादविवाद होऊ द्यायचा नाही. सन्मानाने बोलवा असे ते म्हणतात मी तेव्हा देखील म्हणालो होतो समोर येऊन चर्चा करा. फक्त आज जे दाखवता आहे ते गेली अडीच वर्ष कुठे गेले होते. मला माझ्या शिवसैनिकांचा जो विश्वास आहे आणि त्यांच्या अश्रुंचे जे मोल आहेत ते मला जास्त महत्वाचे आहेत.