
जळगाव लाईव्ह न्यूज । थंडीचा नोव्हेंबर महिना संपत आला तरी जळगावकरांना अपेक्षित असलेली बोचरी थंडी अद्याप अनुभवायला मिळत नाहीये. काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या हवामानात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अवघ्या दोन दिवसांत रात्रीच्या किमान तापमानात तब्बल ९ अंशांची वाढ झाल्यानंतर बुधवारी मात्र पाऱ्यात पुन्हा घसरण झाली.
मंगळवारी १७ अंशांवर असलेले किमान तापमान बुधवारी १४.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने जळगाव जिल्ह्यात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी किमान तापमान थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. त्यामुळे पहाटे आणि रात्री बोचऱ्या थंडीचा अनुभव येत होता. मात्र त्यानंतर तापमानात अचानक वाढ झाल्याने थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १३.२ अंशांवर होते. त्यानंतर मंगळवारी पारा थेट १७ अंशांवर पोहोचला. त्यामुळे दोन दिवसांत तापमानात तब्बल ९ अंशांची वाढ झाली. मात्र बुधवारी पुन्हा पारा १४.८ अंशांवर घसरला आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री हलका गारवा अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे.
आगामी काही दिवसांतही तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. २६ नोव्हेंबरला किमान तापमान १४ अंश, २७ रोजी १६ अंश, २८ रोजी १७ अंश, तर २९ आणि ३० नोव्हेंबरला अनुक्रमे १५ आणि १४ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पुढील आठवडाभर कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता नसली तरी वाऱ्याचा वेग आणि कोरडी हवा यामुळे रात्रीच्या वेळी गारवा जाणवत राहणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर संपत आला तरी जळगावकरांची बोचऱ्या थंडीची प्रतीक्षा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.





