बकालेंची बडदास्त ठेवणाऱ्या दोन पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली
जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जानेवारी 2024 । तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंना मोबाइल वापराची सुविधा देणारे ड्यूटीवरील गार्ड आणि जिल्हापेठचे पोलिस कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील यांची पोलिस अधीक्षकांनी पोलिस नियंत्रण कक्षात बदली करून हे प्रकरण मिटवण्यात आले आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बकाले फरार झाले होते. तीन वेळा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही हजर झाले नाही. त्यानंतर मालमत्तेच्या जप्तीचा अर्ज मंजूर होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर बकाले स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाले.
त्यानंतर न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत असताना बकाले यांना मोबाइल फोन व इअर बडचा वापर करू दिल्याचे सचित्र काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते. या प्रकरणाची पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले.