जळगाव जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप!; दोन वेगवेगळ्या भागांत दोघांचा मृत्यू, उष्माघाताची भीती

मे 26, 2026 9:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला असून नागरिकांच्या जीवाची काहीलाही होत आहे. सध्या जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात असल्याने उन्हाच्या तीव्र झळा असह्य होत असून अशातच, जळगाव शहर आणि परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीव्र उन्हाचा चटका सहन न झाल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

tps

केशरलाल दौलत पाटील (वय ५७, रा. चिंचोली, ता. जळगाव) आणि प्रवीण दत्तू मिस्तरी (वय ३६, मूळ रा. पुणे, सध्या राहणार जळगाव) असं मयताचे नाव आहेत. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे समोर आली. चिंचोली येथील रहिवासी असलेले केशरलाल पाटील हे दुपारच्या रणरणत्या उन्हात सेंट्रिंगचे काम करत होते. दुपारी ३ च्या सुमारास उन्हाचा चटका सहन न झाल्याने अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दुसरी घटना: भरचौकात तरुण निपचित पडला

दुसऱ्या एका घटनेत, जळगाव शहरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रा चौकात प्रवीण मिस्तरी हा ३६ वर्षांचा तरुण बेशुद्ध अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आला. नागरिकांनी तातडीने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये तीव्र उन्हाचा फटका बसल्याने (उष्माघाताने) हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

अंतिम अहवालानंतरच कारण अधिकृत होईल: डॉ. गिरीश ठाकूर

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले की, “दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. वरवर पाहता हा प्रकार उष्माघाताचा वाटत असला, तरी मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण काय होते, हे शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल समोर आल्यानंतरच अधिकृतपणे सांगता येईल.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now