व्हाॅइस रेकाॅर्डिंगच्या साह्याने सहकार विभागाचे दोन अधिकारी जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील सहकार विभागाचे दोन अधिकारी घराच्या नाेंदीसाठी मागितले पाच हजार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या वेळेस पंच म्हणून राहिलेले सहकार विभागाचे दोन अधिकारी थेट लाच न घेताही व्हाॅइस रेकॉर्डिंग डिव्हाइसमधील रेकाॅर्डिंगच्या साह्याने जाळ्यात अडकले.
संशयित अधिकाऱ्यांनी सिंधी कॉलनीतील घराची नोंद करून ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीनंतर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सापळाही लावला. दरम्यान, एसीबीच्या कारवाईतील बारकावे माहीत असल्याने संशयितांनी थेट लाच स्वीकारली नाही आणि कारवाई फसली. मात्र, तत्पूर्वी लाचेची मागणी तक्रारदाराकडे असलेल्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड झाली होती, त्या पुराव्याच्या आधारे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पथकाने दोघांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.