जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । तिरुपती, आणि राजस्थानमधील खाटू श्यामच्या दर्शनसाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने तिरुपती-हिसार दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्या जळगावमार्गे धावणार आहेत. रेल्वेच्या एकूण बारा फेऱ्या जाहीर करण्यात आल्या असून, खाटू श्याम व तिरुपती जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांची सोय झाली आहे.

०७०१७ विशेष गाडी १० जुलै ते २५ सप्टेंबर या काळात दर बुधवारी तिस्पतीहून ११.४५ वाजता निघेल. शुक्रवारी सकाळी ८.०२ वाजता जळगावात पोहोचेल. रिंगसला उतरून प्रवासी खाटू श्याम जाऊ शकतात. तर ०७०१८ विशेष गाडी १४ जुलै ते २८ सप्टेंबर या काळात दर रविवारी हिसारहून ११.१५ वाजता रेल्वे निघेल. मंगळवारी पहाटे ५.४५ वाजता जळगावला थांबा घेईल आणि तिरूपतीसाठी रवाना होईल. या रेल्वे गाड्यांना तिरुपती, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, सुरत, अजमेर, किशनगंज, फुलेरा, रिंगस (नजीकचे रेल्वे स्थानक, खतुळकर, नागरगाव) आदी ठिकाणी थांबा असणार आहे. २० एसी ३ टायर, २ जनरेटर कार एकूण २२ एलएचबी कोच अशी कोच संरचना आहे.

रेलवन ॲपवर तिकीट बुकिंग केले तर मिळेल 3 टक्के सूट
रेलवन हे भारतीय रेल्वेचे नवीन सुपर ॲप आहे. ज्याने अनेक जुन्या रेल्वे ॲपची सर्व वैशिष्ट्ये एकाच प्लॅटफॉर्मवर आणले आहे. या ॲपमध्ये आर-वॉलेट नावाची डिजिटल वॉलेट सुविधा देखील देण्यात आलेली आहे. ज्याचा वापर करून प्रवासी आरक्षण तिकिटे, जनरल तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतात. या आर-वॉलेटचा वापर करून अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी केली तर प्रवाशांना ३ टक्के सूट दिली जाते आहे.
भुसावळमार्गे धावणारी प्रेरणा एक्स्प्रेस आता अजनी थांबणार
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणच्या समन्वयाने नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे काही गाड्यांना नागपूरऐवजी अजनीला थांबा देण्यात आला आहे. यामध्ये भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वेंचा समावेश आहे. २२१३८ अहमदाबाद नागपूर प्रेरणा सुपरफास्ट एक्स्प्रेस ३ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान सकाळी १०:१५ वाजता अजनी थांबेल.









