बुधवार, सप्टेंबर 13, 2023

कंडारी हादरले : जुन्या वादातून दोघा भावंडांची निर्घृण हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत.

दरम्यान, या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, खुनाच्या कारणामागे जुने वाद असल्याचे कारण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले असून हल्लेखोर खुनानंतर पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

खुनाने भुसावळ तालुका हादरला
सूत्रांच्या माहितीनुसार, कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद असून त्या वादाची ठिणगी शुक्रवारी पडल्यानंतर हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस यंत्रणेची धाव
कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कंडाारी येथे घडलेल्या दुहेरी खुनाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शहरातील गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे.