घरी लक्ष्मी आल्याचे सांगत आजीला दोघांनी गंडविले, सोन्याची पोत लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ जानेवारी २०२३ | जळगाव शहरातील राजेश्री शाहू महाराज रुग्णालयात बाळंतीण नातीला डबा देऊन घरी जात असलेल्या एका वृध्द महिलेला दोघांनी थांबविले. तुझ्या घरी लक्ष्मी आली, तू भाग्यवान आहेस. दुनिया खराब आहे. पोत काढून कागदात ठेव असे सांगितले. आजीला विश्वासात घेत दोघांनी सोन्याची पोत घेऊन पोबारा केला.

कानळदा येथील कमलाबाई रामचंद्र सोनवणे वय – ६५ यांची नात पुजाबाई सोनवणे नुकतेच बाळंतीण झाल्या असून राजेश्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. दि.११ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नातीला जेवणाचा डबा देऊन कमलाबाई घराकडे पायी परतत होत्या. नूतन मराठा महाविद्यालय समोरील गल्लीत मागून आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले. ‘तुझ्या घरी लक्ष्मी आली आहे. तू भाग्यशाली आहेस.’ असे सांगून तुला दम लागला असेल बाजूला पायरीवर बस सांगितले.

‘दुनियादारी चांगली नाही, तुझ्या गळ्यातील पोत काढून कागदात ठेव, घरी गेल्यावर पुडी उघड, मागे पाहू नको’ असे सांगितले. आजी कमलाबाई पुन्हा दवाखान्यात गेल्या आणि त्यांनी कागदाची पुडी नातीच्या हातात दिली. नातीने पुडी उघडुन पाहिली असता त्यात काहीही आढळून आले नाही. आपली फसवणूक करून ८ ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची पोत चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.