Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । मालकी हक्काचे जागेपेक्षा सार्वजनिक जागेवर बेकायदा अतिक्रमण करून वाढीव घरांचे बांधकाम केल्याप्रकरणी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष जगन्नाथ महाजन व छायाबाई सुभाष पाटील यांना त्यांच्या पदावरून अपात्र ठरवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या महत्वपूर्ण निकालामुळे गावातील वाढते अतिक्रमण रोखण्यास मदत होणार आहे.
आडगाव तालुका एरंडोल येथील रवींद्र हरी साबळे व रवींद्र आसाराम महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार दिली होती. त्यावर चौकशी होऊन त्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी दोन्ही सदस्यांना पदावरून अपात्र ठरविले आहे. आडगाव ग्रामपंचायत सदस्य संतोष माळी व छायाबाई पाटील यांनी व कुटुंबप्रमुखांनी मालकी हक्काचे जागेपेक्षा सार्वजनिक व शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून राहते घरांचे बांधकाम केले आहे, अशी तक्रार करण्यात आली होती त्यावर सुनावणी होऊन ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक गटारीवर ओटा पडद्या पायऱ्या चे वाढीव घराचे बांधकाम सिद्ध झाल्यामुळे दोन्ही सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे तक्रारदार साबळे व महाजन यांच्यातर्फे ॲड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.