जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून याच दरम्यान गणेशोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान शनिपेठ पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आलेला असतानाही शहरात वावरत होता, तर दुसरा बाजारात चॉपर घेऊन दहशत निर्माण करत होता.

महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) व संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) असं अटक केलेल्या दोघा गुन्हेगारांचे नाव असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, यातील महेंद्र महाजनला खून आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे दोन वर्षांसाठी जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, पोलिसांना तो रथ चौक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तर गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांना भिलपुरा आणि घाणेकर चौकादरम्यान संदीप नाथ हा हातात चॉपर घेऊन लोकांमध्ये भीती निर्माण करताना आढळला. पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले आणि त्याच्याकडून धारदार चॉपर जप्त केला.
यांनी केली कारवाई?
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी आणि उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, नवजीत चौधरी, योगेश साबळे, रविंद्र तायडे, निलेश घुगे, अमोल बंजारी, पराग दुसाने आणि प्रतिभा खैरे यांचा समावेश होता.










