तरुणाच्या खूनप्रकरणी काही तासात एमआयडीसी पोलिसांनी दोघांना पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या प्रमोद सुरेश शेटे वय-३३ या तरुणाचा खून करण्यात आल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले होते. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोन संशयितांना पकडले आहे. दोघांना तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे.

मेहरूण परिसरातील जय भवानी नगरात राहणारे प्रमोद सुरेश शेटे वय-३३ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामाला आहेत. दररोज ते दुचाकीने ये-जा करतात. दि.१० रोजी सकाळी ७ वाजता ते कामावर गेले मात्र दुपारी ५ वाजेपर्यंत घरी परतलेच नाही. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

प्रमोद शेटे यांच्या मालकाला फोन केला असता ते ४ वाजताच कामावरून निघाले असल्याची माहिती समोर आली. तसेच मानराज पार्क येथे त्यांना काही नागरिकांनी देखील पाहिले होते. दोन दिवस होऊन देखील मुलगा घरी न आल्याने सुरेश हरी शेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, निमखेडी शिवारात रेल्वे पुलाजवळील टेकडीवर सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता तो मृतदेह प्रमोद शेटे याचा होता. प्रमोदचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. एक संशयिताचे नाव समोर येताच पोलिसांनी लागलीच शोध सुरू केला होता.

एमआयडीसी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. खून नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.