जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाल्यांचा त्रास वाढला आहे. त्यातच चोरटे देखील सक्रिय आहेत. अशातच रेल्वे स्थानकावर आरपीएफ, जीआरपीतर्फे केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईल चोरीची कबुली मिळाल्याने त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले आहे.

प्लॅटफॉर्म ६ वर आरपीएफ जवान जे.बी. नेरपगार, महेंद्र कुशवाह, कपिल सांगवान, अनुज कुमार व बाबू मिर्झा हे गस्त घालत असताना एक संशयीत फिरताना आढळला. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव नितीन संजय धनके (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे सांगितले. त्याच्या पँटच्या खिशातून २० हजाराचा मोबाईल मिळाला. सदर मोबाईल भुसावळ स्थानकावर झांसी एक्स्प्रेस (०१९२१) च्या स्लीपर कोचमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

तर शुक्रवारी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर धनबाद एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये प्रदीप विलास ठोमरे (क्य २५) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेतले असता, त्याने चोरीच्या उद्देशाने स्थानकावर आल्याची कबुली दिली. त्याला लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले असून, त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाई ही निरीक्षक पी.आर. मीणा व लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.










