जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । गेल्या काही दिवसापासून केळीला भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यातच केळीला चांगला भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत असलेल्या निंभोरा बु. (ता. रावेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. विशेष म्हणजे (Raver) रावेरमध्ये केळीच्या भावसंबधी जिल्हाधिकारी यांनी मिटिंग घेतली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. हर्षल रवींद्र नेहते (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील हर्षल नेहते यांनी शेतात केळीची लागवड केली होती. चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केळी कापणी करून ती विक्रीच्या वेळी केळीला अपेक्षित भाव नव्हता. यामुळे लाखो रुपयांनी मिळणारे उत्पन्न घटले. यामुळे केळी उत्पादनासाठी लागलेला खर्चही देखील निघाला नाही. शिवाय केळीसाठी कर्ज देखील घेतले होते.
केळीला चांगला भाव न मिळाल्याने हर्षल नेहते हे कर्ज कसे फेडावे व व्यवहार कसे करावे, या विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या नैराश्येतून त्यांनी शेतात ६ मे रोजी पेरूच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात हरीश युवराज नेहते यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला.