⁠ 
रविवार, मे 19, 2024

जळगावात भीषण अपघात ; दोन बालकांसह महिलेचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच आता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला आहे. मयत तिन्ही जण हे एकच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समजत आहे.

राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७), सर्व रा. रामदेववाडी, जळगाव असे मयत आई व मुलांचे नाव आहे. त्यांचा परिवार मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. मंगळवारी दि. ७ मे रोजी राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर अचानक आलेल्या एम एच १९ सी.व्ही. ६७६७ या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकल्या गेल्या. त्यात राणी चव्हाण व सोमेश या रस्त्यावर आपटून जागीच ठार झाल्या. त्यासह डोक्याला मार लागल्याने सोहन याचादेखील मृत्यु झाला.

दरम्यान घटनास्थळी अपघात झाल्याची माहिती मिळताच जमावाने रास्ता रोको केला. या ठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव प्रक्षुब्ध झालेला होता. यामुळे चार तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच होता. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळाले. या दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे उमेश ज्ञानोबा गायकवाड (३०) आणि एक महिला पोलीस जखमी झाले आहे. दरम्यान, दगडफेकीप्रकरणीदेखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.