जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । भुसावळहून पुण्याकडे जाणारी खासगी बस उलटून अपघात झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे या गावादरम्यान रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात ८ ते १० प्रवासी जखमी असून जखमींमध्ये तीन-चार बालकांचाही समावेश आहे. दरम्यान, अपघात होताच बसचालक तिथून पसार झाला.

रस्त्याचे काम सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, दुसरीकडे बसचालक व वाहकात वाद झाला, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातून पुणेकडे ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच.१९.सीवाय.२२२४) ही जात होती. गारखेडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात काही प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचल्या. बेबाबाई घाडे (७५), साहील घाडे (८, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (४०), दिशा इंगळे (८, दोन्ही रा. बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (३४) आणि रणजित राजपूत (३०, दोन्ही रा. भुसावळ) या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले. या बसमधील अन्य १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.अन्य प्रवाशांनी भुसावळला परत जात असल्याचे सांगितल्याने रुग्णवाहिकेतून भुसावळात पोहचविण्यात आले.
पुण्याहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमधून जवळपास २५ प्रवासी प्रवास करत जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ धावत्या बसचे टायर फुटले.