जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ पुंडलिक सोनवणे व अमळनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजल प्रमोद पाटील या दोघांची जिल्ह्यातून बदली झाली आहे. सोनवणे यांना अमरावती येथे कार्यकारी अभियंता, नगर परिषद प्रशासन संचालनालय येथे तर प्रांजल पाटील यांना नागपूर येथे कार्यकारी अभियंता नगर परिषद प्रशासन संचालनालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची विभागीय चौकशी सुरू असल्याने त्यांची बदली करण्यात यावी या मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठविले आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यासह जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे व अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांच्याबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या.या दरम्यान त्यांनी विधान परिषदेत आवाज उठविला होता. त्यानंतर तिन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या विभागीय चौकशीच्या अनुषंगाने नवनाथ सोनवणे व प्रांजल पाटील यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बांधकाम विभागाचे अवर सचिव द. व. खारके यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यावर विविध प्रकारचे पाच दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सोनवणे यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी आमदार खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे १० जून रोजी केली आहे.







