⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

VIDEO : वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले, दोघे बैल जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२३ । जळगाव शहर परिसरासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच आता जळगाव कानळदा रोडवर रासायनिक खते घेऊन शेतात जाणाऱ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात दोघा बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातात शेतकरी थोडक्यात बचावला असून अपघातानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंग जवळ दगडू राजाराम धनगर (रा. आव्हाणे ता. जि.जळगाव) यांचे शेत असून ते आज सकाळी १० वाजता मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात येते होते. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्‍या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.

या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, अन्यथा त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता होती.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता.