जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत. ऐन गरजेच्या वेळी इंधन मिळत नसल्याने वाहनधारक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाचे देखील कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटनाचा हंगाम ऐन तेजीत असतानाच डिझेल मिळत नसल्याने अनेक ट्रॅव्हल्स चालकांवर नियोजित ट्रिप रद्द करण्याची वेळ आली असून, हा व्यवसाय संपूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरायला जात असल्याने या काळात टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, याच मुख्य हंगामात डिझेल तुटवड्याचे संकट ओढवल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे गणित कोलमडले आहे. डिझेलअभावी पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक गाड्या जागेवरच उभ्या असल्याने व्यावसायिकांना दररोज हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
या टंचाईचा सर्वात मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून असलेल्या रोजंदारीवरील वाहन चालकांना बसला आहे. गाड्याच रस्त्यावर धावत नसल्याने चालकांची रोजंदारी पूर्णपणे बुडाली आहे. ऐन सुट्ट्यांच्या दिवसांत हक्काची कमाई बंद झाल्यामुळे आता चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.







