जळगाव लाईव्ह न्यूज । कधी काळी शंभर दर मिळालेल्या टोमॅटोला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाट्याची लालीच फिकी झाली. एकीकडे निसर्गाचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा त्रास असताना दुसरीकडे मात्र पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने नाराजी आहे.

अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी टमाट्याची लागवड केली. मशागतीपासून ते तोडणीपर्यंत मोठा खर्चही केला. वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ नये, म्हणून डोळ्यात तेल व जीव धोक्यात घालून पिकांची राखणी केली. यामुळे लागवड क्षेत्र टमाट्याच्या लालीने बहरून गेले. दोन पैसे पदरात पडतील, या आशेने टमाट्याची तोडणी केली. मात्र, बाजारात विक्रीसाठी दाखल करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.
कष्ट करून पिकविलेल्या टमाट्याला पाच रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. कवडीमोल भावात विक्री करावी लागत असल्याने शेती करावी तरी कशी? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा नवीन प्रयोग म्हणून तसेच एप्रिल महिन्यात भाव चांगला मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टमाट्याची लागवड केली. मात्र आतापासूनच भाव पडायला सुरुवात झाली असून सध्या ५ रूपये दराने टमाट्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पडलेल्या भावामुळे शेतकरी मेटाकुटीली आला आहे.