राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय; २० जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’, जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती?

जुलै 20, 2026 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

rain 1

हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीगंगानगर, हरदोई, रांची, सागर, वाराणसी ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याचा प्रभाव राज्यातील अनेक भागांवर दिसून येत आहे. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले.

चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा
राज्यात पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे पिके करपण्याची भीती निर्माण होऊन शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला होता. मात्र, आता सर्वदूर सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now