⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

खबऱ्यांचे भाव वाढले, शासनाचे घटले.. पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करावी तरी कशी?

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जगाचा विस्तार जसजसा वाढतोय तसे तंत्रज्ञान देखील अपडेट होत आहे. कुशल कामगारांची जागा मशीन आणि रोबोट घेत आहे. मंदीची लाट येऊ पाहत आहे तर बेरोजगारी वाढली आहे. वाढत्या बेरोजगारीच्या संकटात गुन्हे देखील वाढले असून पोलिसांना गुन्ह्यांची उकल करणे अवघड होऊन बसले आहे. गुन्हे उघड तर होत आहे परंतु त्यासाठी पोलिसांना खबऱ्यांची मदत घेणे खर्चिक झाले आहे. कधीकाळी फुकटात माहिती पुरविणारे खबरे आता हजारोंची अपेक्षा ठेवू लागले आहे. पोलिसांना शासनाकडूनच खबरी भत्ता मिळत नसल्याने पैसे द्यावे तरी कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांचे तपासाचे नेटवर्क प्रचंड स्ट्रॉंग असते असे म्हटले जाते. पोलिसांनी ठरवले तर कोणताही गुन्हा सहजासहजी ते उघड करू शकतात. पोलिसांच्या तपासाच्या नेटवर्कमध्ये तंत्रज्ञान, हिस्ट्रीशिटरची माहिती, गुन्ह्याची पद्धत, खबरी अशी साखळी असते. साखळीतील कोणत्याही कडीकडून मिळालेला धागा पकडत पुढे तपस सुरु होतो. आजच्या काळात तंत्रज्ञान पुढे गेले असले तरी खबरीचे महत्व टिकून आहे. तंत्रज्ञानाच्या नजरेतून जे सुटते ते हेरण्यात खबरी यशस्वी होतो. एखाद्या संशयितांची एखादी वेगळी हालचाल किंवा वागणे त्याच्या लागलीच लक्षात येते.

जळगाव जिल्ह्यात देखील पोलिसांचे मोठे नेटवर्क आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एलसीबीचे नेटवर्क स्ट्रॉंग मानले जाते. आजच्या पंधरा, वीस वर्षापूर्वी गुन्हेगार देखील ठराविक होते आणि त्यांची गुन्हे करण्याची पद्धत देखील ठरलेली होती, त्यामुळे कोणताही गुन्हा घडला कि पोलिसांना गुन्हेगार ओळखणे सहज शक्य होत होते. पोलिसांचा जनसंपर्क देखील दांडगा असल्याने खबरी देखील माहिती लागलीच पोहचवत होते. विशेष म्हणजे माहितीच्या बदल्यात खबरींना कोणतीही अपेक्षा नव्हती. पोलीसदलातील आपली ओळख हाच त्यांचा फायदा होता.

गेल्या काही वर्षात मात्र सर्वच बदलेले आहे. कोणत्याही राज्यातील गुन्हेगार कुठेही जाऊन गुन्हा करतो. गुन्हे करण्यासाठी देखील नवनवीन पद्धतीचा उपयोग केला जातो. बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोलीस देखील गुन्हेगारांना शोधत आहेत. काही गुन्हेगार हुशार झाले असून गुन्हा करताना तंत्रज्ञान जितके लांब ठेवता येईल तेवढा प्रयत्न ते करतात, त्यामुळेच ते पोलिसांच्या तावडीतून सुटतात. जे पोलिसांच्या नजरेतून सुटते ते हेरण्यात खबरी, झिरो पोलीस, टिप्पर यशस्वी होतात. आजच्या युगात खबरींचे महत्व टिकून आहे.

खबरींना देण्यासाठी पूर्वी पोलिसांना भत्ता मिळत होता. रक्कम मोठी नसली तरी ती पुरेशी होती. सध्या पोलिसांकडून खबऱ्यांना भत्ता दिला जात नाही, म्हणजे शासनाकडूनच तो बंद करण्यात आला आहे. आजकाल खबरी एखादी माहिती पुरविण्यासाठी थोडे थोडकी नव्हे तर चक्क १० हजारांच्या पुढेच मागणी करतात. एखादी माहिती सांगतांना अव्वाच्या सव्वा वाढवून ते सांगतात. उदाहरण सांगायचे तर एखाद्या दुचाकी चोरट्याची माहिती देताना त्याच्याकडे ३०-४० दुचाकी सापडतील अशी माहिती खबरी पोलिसांना देतो परंतु मुळात त्या चोरट्याकडून फार प्रयत्न करून देखील १० ते १२ च दुचाकी मिळून येतात. खबरी पूर्ण माहिती देखील देत नाही फक्त हा इथे दिसला, तिथे माल आहे असे ते सांगतात.

खबरींचे भाव वाढल्याने हजारोंची रक्कम त्यांना द्यावी तरी कशी असा प्रश्न आज पोलिसांसमोर उभा राहिला आहे. अवैध धंदे सुरु असताना पोलीस हफ्ते घेतात असा आरोप होतो पण पोलिसांना खबरींना देखील पैसे द्यावे लागतात हि बाब देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मुळात सध्या लोकसंख्या अधिक आणि पोलीस कर्मचारी कमी, त्यातच बंदोबस्त, नोटीस बजावणी आणि इतर कामांना देखील पोलीस मनुष्यबळ वापरावे लागते. खबरींना भत्ता देण्यासाठी शासनाने काही तरतूद करणे आवश्यक आहे.