⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

..तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार : लोहारा येथील ग्रामस्थांचा निर्धार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । लोहारा ( ता. पाचोरा ) येथील आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा कार्यरंभ आदेश मिळवण्यासाठी तालुक्यातील लोहारा सरपंच व ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण पुकारले आहे. या उपोषणस्थळी शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जि.प. पदाधिकाऱ्यांनी या उपोषणस्थळी भेट दिली. दरम्यान, जो पर्यंत आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा कार्यरंभ आदेश मिळत नाही. तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा लोहारा सरपंच व ग्रामस्थांनी घेतला आहे. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत तोडगा न निघाल्याने हे उपोषण सुरूच होते.

सविस्तर असे की, लोहारा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते, अशी गंभीर परिस्थिती आहेत. तसेच लोहारासह ११ गावात रुग्णांची सोय व्हावी, वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार जानेवारी महिन्यात निविदा उघडण्यात येवूनही ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाही.

त्यामुळे लवकरात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामास कार्यारंभ आदेश द्यावा या मागणीसाठी लोहार सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारले आहे. दरम्यान, उपोषणाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली. कामाला मंजुरी द्या किंवा निविदा रद्द करण्यासंदर्भात पत्र द्या, अशा सूचना सीईओ डॉ. पंकज आशिया यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि.प.सदस्य दीपकसिंह राजपूत, जि.प.सदस्य पद्मसिंग पाटील, कॉंग्रेसचे जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे, जि.प.सदस्य पवन सोनवणे, संजय पाटील, माजी जि.प.सदस्य उध्दव मराठे, अरुण पाटील आदींनी भेट दिली.